
परभणी, 05 जून (हिं.स.)।
शासन सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित अडचणी वेळेत व संवेदनशीलतेने सोडविल्यास प्रशासन अधिक कार्यक्षम बनेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार विभागातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालय स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आयोजित करण्यात येणाऱ्या कर्मचारी समाधान शिबिराअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे होते.यावेळी निवासी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण, तहसीलदार रामदास कोलगणे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, शासकीय कर्मचारी हे प्रशासनाचा महत्त्वाचा कणा आहेत. कर्मचारी मानसिकदृष्ट्या समाधानी व तणावरहित असतील तर ते अधिक कार्यतत्परतेने काम करून नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने व जलदगतीने सोडवू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, पदोन्नती, बदली, सेवापुस्तिका अद्यावतीकरण, रजा रोखीकरण, पेन्शन, सेवानिवृत्ती उपदान आदी सेवाविषयक अडचणी प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे.सेवापुस्तिका वेळेत अद्यावत करणे तसेच सेवानिवृत्तीपूर्व सहा महिने अगोदर पेन्शन प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी संबंधित विभागांना दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis