
३० उद्यानांमध्ये झाडेच शिल्लक नाहीत
लातूर, 05 जून (हिं.स.)। लातूर शहराचे सौंदर्य आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले लातूर शहरातील बहुतांश 'ग्रीन बेल्ट' (हरित पट्टे) सध्या दुरवस्थेत आहेत. अपुरे मनुष्यबळ आणि लोकसहभागाच्या अभावामुळे शहरातील एकूण १४७ पैकी ३० ग्रीन बेल्ट पूर्णपणे भकास झाले आहेत. तर तब्बल ८० ग्रीन बेल्टच्या जागेवर मंदिरे आणि समाजमंदिरे उभारण्यात आल्याने या जागा मूळ उद्देशापासून भरकटल्याचे चित्र आहे.
वेगाने विकसित होणाऱ्या लातूर शहरात नागरिकांना घरापासून जवळच निसर्गरम्य वातावरण मिळावे, यासाठी ग्रीन बेल्टची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, सध्या ३० उद्यानांमध्ये झाडेच शिल्लक नाहीत. वॉकिंग ट्रॅक आणि उद्यानाच्या संरक्षक भिंती (कंपाउंड) तुटल्या आहेत, तसेच तिथे मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने नागरिकांनीही पाठ फिरवली आहे. प्रशासनाने सुरुवातीला हे पट्टे विकसित केले, मात्र त्यांचे सौंदर्य टिकवण्यात त्यांना अपयश आले आहे. सध्या केवळ ३७ ग्रीन बेल्ट सुस्थितीत आहेत. या दुरवस्थेमागे कर्मचाऱ्यांची तीव्र टंचाई हे प्रमुख कारण आहे.
एका ग्रीन बेल्टच्या देखभालीसाठी किमान २ कर्मचारी याप्रमाणे पालिकेला २९० कर्मचाऱ्यांची आवश्यकता
आहे. मात्र, उद्यान विभागाकडे सद्यःस्थितीत केवळ ६ कर्मचारीच उपलब्ध आहेत. नवीन पदभरतीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मनुष्यबळाअभावी हिरवळ संपत चालली आहे. एआय इमेज ग्रीन बेल्टमधील झाडे नष्ट झाली नागरिकांसाठी असलेले बॉकिंग ट्रॅक
पूर्णपणे तुटलेले आहेत. कंपाउंड बॉल ढासळलेली आहे. उद्यानांमध्ये नागरिकांऐवजी मोकाट जनावरांचा मुक्त वावर वाढला आहे. उद्यान विभागासाठी आवश्यक कर्मचारी पदभरतीसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु, त्याला अद्याप मंजूरी मिळालेली नाही.
लातूरमध्ये एकूण १४७ ग्रीन बेल्ट आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील तब्बल ८० ग्रीन बेल्टचा वापर विविध मंदिरे, समाजमंदिरे आणि सभागृहांसाठी केला जात आहे. याचाच अर्थ निम्म्याहून अधिक जागांवर सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. केवळ ३७ग्रीन बेल्ट सध्या सुस्थितीत असून, उर्वरित जागांची मोठी दुरवस्था झाली आहे.
शहराचा विकास करताना पर्यावरण संवर्धनासाठी राखीव ठेवलेल्या जागेला 'ग्रीन बेल्ट' म्हणतात. इथे फळझाडे, फुले, आयुर्वेदिक वनस्पती आणि मुलांसाठी खेळणी असतात. हे पट्टे केवळ करमणुकीसाठी नसून वाढते प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहराची 'फुप्फुसे' म्हणून अत्यंत मोलाची भूमिका बजावतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis