जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लातूरमध्ये पर्यावरण जनजागृती सायकल रॅली
लातूर, 05 जून (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर, लातूर सायकलिस्ट क्लब आणि आपले आरोग्य आपलीच जबाबदारी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा न्यायालय, लातूर ये
जागतिक पर्यावरण दिन


लातूर, 05 जून (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर, लातूर सायकलिस्ट क्लब आणि आपले आरोग्य आपलीच जबाबदारी या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा न्यायालय, लातूर येथून प्रारंभ झालेल्या या रॅलीला सायकलप्रेमी, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि निरोगी आरोग्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा रॅलीचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी जिल्हा न्यायाधीश राहुल भोसले, मुख्य न्यायदंडाधिकारी सतीश पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अनंत देशमुख, सलीम जमादार, माधुरी कुलकर्णी, प्रनील आवळे, अंजली वाघ आणि करण जाधव हे न्यायाधीशही उपस्थित होते.

रॅलीमध्ये लातूर सायकलिस्ट क्लबचे संस्थापक अध्यक्ष सतीश खोबरे, सहाय्यक सचिव विवेक नरहरे, सचिव गणेश हाके, कोषाध्यक्ष श्याम शेटे, उपाध्यक्ष विकास कातपुरे तसेच आपले आरोग्य आपलीच जबाबदारी संस्थेचे संस्थापक संजय राजुळे यांच्यासह मोठ्या संख्येने सायकलपटूंनी सहभाग नोंदविला. यावेळी संजय भारुका यांनी पर्यावरण आणि आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध अधोरेखित करत नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. वाढते प्रदूषण, वृक्षतोड, प्लास्टिकचा अतिवापर आणि रासायनिक पदार्थांचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

रॅलीदरम्यान झाडे लावा – पर्यावरण वाचवा, सायकल चालवा – आरोग्य जपा आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरण घडवा अशा घोषणांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सहभागी नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्पही केला.

या कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस हवालदार केंद्रे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यंकटेश गिरवलकर, संजय राजुळे, विकास कातपुरे तसेच विविध संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande