माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे अल्पशा आजाराने निधन
पुणे, 05 जून (हिं.स.) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनंतराव थोपटे (९३) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज, शुक्रवारी त्यांच्यावर अंत
अनंतराव थोपटे


पुणे, 05 जून (हिं.स.) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनंतराव थोपटे (९३) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज, शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचा जन्म 11 जानेवारी 1933 रोजी हातनोशी, ता. भोर येथे झाला. अनंतराव थोपटे हे वेल्हे तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी म्हणून काम करीत होते. भोर विधानसभा मतदारसंघात उषा चौधरी या बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे भोर तालुक्यातील नागरिकांनी अनंतराव थोपटे यांना अपक्ष म्हणून उभे केले आणि अनंतराव थोपटे भोर विधानसभा मतदारसंघातून १९७२ साली पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सहा वेळा प्रतिनिधित्व केले. सुमारे चौदा वर्षे राज्य मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री होते. तसेच ते पुण्याचे पालकमंत्री देखील राहिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर थोपटे काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते होते. अनंतराव थोपटे यांना १९८३ साली पहिल्यांदा वसंतदादा पाटील यांनी मंत्रिपदाची संधी दिली होती. पुणे जिल्ह्यात शरद पवारांना टक्कर देऊन काँग्रेस पक्ष वाढण्यात थोपटे यांचे मोठे योगदान होते. माजी आमदार आणि भाजपचे नेते संग्राम थोपटे यांचे ते वडिल होते.

तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखाना, दत्त दिगंबर वाहतूक संस्थेची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्षे भूविकास बँकेचे संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक होते. प्रशासन आणि विकासकामांचा उत्तम समन्वय साधणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.

1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande