
नाशिक, 05 जून (हिं.स.)। नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजप नेते गणेश गीते यांनी उमेदवारी मागे घेताना आपल्या पक्षातील काही लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना गीते यांनी नाशिकमधील सत्ताधारी लोकप्रतिनिधी दडपशाही, ब्लॅकमेलिंग आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला.
गीते यांनी सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. वरिष्ठ नेतृत्वाने ‘महायुती धर्म’ पाळण्याचे निर्देश दिल्यानंतर पक्षशिस्त मान्य करून त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय कोणत्याही पदाच्या किंवा आश्वासनाच्या बदल्यात घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकच्या विकासासाठी शहरातील गुंडागर्दी आणि दडपशाही थांबणे आवश्यक असल्याचे सांगताना गीते म्हणाले की, गेल्या एक-दोन वर्षांपासून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात आहे. हा त्रास देणारे दुसरे कोणी नसून स्वतःच्या पक्षातील काही लोकप्रतिनिधी असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील व्यापाऱ्यांना सर्रास ब्लॅकमेल केले जात असून अनेक व्यावसायिक भीतीच्या वातावरणात काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पोलीस प्रशासनावर थेट टीका करण्याऐवजी गीते यांनी काही लोकप्रतिनिधींवरच निशाणा साधला. विरोधकांना अडकवण्यासाठी आणि खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी काही जणांनी खास माणसे ठेवली असून त्यांच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. म्हाडा प्रकरणात आपला कोणताही संबंध नसतानाही आपल्याला जाणीवपूर्वक गोवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक प्रामाणिक व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला.नाशिकचा खरा विकास होऊ शकत नाही. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, त्यांनी स्वतः नाशिकमध्ये लक्ष घालावे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
गणेश गीते यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींवरच गुंडागर्दी, ब्लॅकमेलिंग आणि सत्तेच्या गैरवापराचे आरोप झाल्याने भाजप नेतृत्वाची कोंडी झाली असून या आरोपांवर मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV