
अमरावती, 05 जून (हिं.स.) | तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा तातडीने देण्यात यावा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी तिवसा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन तहसीलदार, तिवसा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खरीप हंगाम २०२५-२६ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांचे उत्पन्न घटल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाच्या पीक विमा योजनेत सहभागी होऊनही अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप विमा परतावा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त आणि पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी तसेच प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामविकास, समाजप्रबोधन, राष्ट्रनिर्माण आणि स्वातंत्र्य चळवळीत दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आपल्या कीर्तन, प्रवचन आणि विचारांच्या माध्यमातून त्यांनी समाजात जागृती निर्माण केली. ग्रामीण विकासाचा संदेश देत त्यांनी देशहितासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, हे निवेदन सादर करताना गुरुदेव भक्त आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी दोन्ही मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या आंदोलनात्मक निवेदनामुळे तालुक्यातील शेतकरी आणि गुरुदेव भक्तांच्या भावना शासनापर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी