प्लास्टिकच्या कचऱ्यातून हिरवाई ! संकल्प संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अभिनव जल-वृक्ष उपक्रम
डोंबिवली, 05 जून (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत निळजे येथील संकल्प संस्था संचलित सर्वोदय विद्यालय, रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूल आणि सुमनताई वसंत पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाचा एक अभिनव
Ph1


डोंबिवली, 05 जून (हिं.स.)।

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत निळजे येथील संकल्प संस्था संचलित सर्वोदय विद्यालय, रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लिश स्कूल आणि सुमनताई वसंत पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाचा एक अभिनव आणि प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे. शुक्रवारी या शैक्षणिक संकुलातील ५० हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी स्वतः तयार केलेल्या देशी वृक्षांच्या रोपांची यशस्वी लागवड करत जल-वृक्ष उपक्रम राबविला.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, रोपांची निर्मिती आणि लागवड करण्यासाठी वापरण्यात आलेली पर्यावरणपूरक पद्धत. विद्यार्थ्यांनी परिसरातील टाकाऊ प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्यांचा पुनर्वापर केला. बाटल्यांचे दोन भाग करून खालच्या भागात माती भरून देशी वृक्षांची बीज पेरण्यात आली, तर वरचा भाग झाडांच्या शेजारी जमिनीत पुरून जलसंवर्धनासाठी वापरण्यात आला. या नाविन्यपूर्ण तंत्रामुळे प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन तर झालेच, शिवाय कमी पाण्यात झाडांना सातत्याने आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होणार आहे.

हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, संकल्प संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षक सातत्याने प्लास्टिक पुनर्वापर, रोप निर्मिती आणि जलसंवर्धन यांचा संगम साधत हा प्रकल्प पुढे नेत आहेत.

या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संकल्प-सर्वोदय शैक्षणिक संकुल परिसरात आतापर्यंत सुमारे एक हजार झाडांचे यशस्वी संवर्धन करण्यात आले आहे.

या अभिनव जल-वृक्ष उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाली आहे. प्लास्टिकच्या सुयोग्य वापरातून निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, कचऱ्यातून सृजन या संकल्पनेचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande