
परभणी, 05 जून, (हिं.स.)। शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांच्या तपासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावेत, अशी मागणी स्वराज इंडिया परभणीचे जिल्हाध्यक्ष गोविंद उत्तमराव गिरी यांनी जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परभणी शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. विविध गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेण्यासाठी तसेच गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी या कॅमेर्यांची महत्त्वपूर्ण मदत होत असते. मात्र, अलीकडेच एका वाहन चोरीच्या प्रकरणात तक्रार करताना संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. कॅमेर्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ते बंद अवस्थेत असल्याचे समोर आले असून ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरात वाढत्या चोरी, घरफोडी आणि इतर गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा बंद असणे हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून कोणत्याही परिस्थितीत सीसीटीव्ही कॅमेर्यांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, सर्व कॅमेरे नियमितपणे कार्यरत ठेवावेत तसेच शहरात वाढीव सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी गिरी यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis