
सोलापूर, 05 जून (हिं.स.) : आगामी 12 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात बालकामगार प्रतिबंधासाठी विशेष जनजागृती आणि तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सोलापूर यांच्या मार्फत जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली असून, 12 जून 2026 रोजी कारखाने, आस्थापना, हॉटेल्स, गॅरेज तसेच धोकादायक उद्योगांमध्ये भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे.
या मोहिमेत बालकामगार विरोधी जनजागृती, पोस्टर लावणे, तसेच बालकामगार प्रथेविरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान 14 वर्षांखालील बालकामगार आढळल्यास त्यांची मुक्तता करून संबंधित आस्थापनांवर बालकामगार अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच, प्रत्येक मालक/चालकाकडून त्यांच्या आस्थापनामध्ये बालकामगार काम करत नाहीत आणि भविष्यातही कामावर ठेवले जाणार नाहीत, असे हमीपत्र घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बालकामगार ठेवणे हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारची कोणतीही घटना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश रा. झोले यांनी दिला आहे. नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी बालकामगारांना कामावर न ठेवता कायद्याचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड