रत्नागिरी : जिजाऊ संस्थेच्या रुग्णालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
रत्नागिरी, 5 जून (हिं.स.) । येथील भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाने अवघ्या एका वर्षात आरोग्यसेवेचे एक उत्तम उदाहरण प्रस्थापित केले आहे. या रुग्णालयात वर्षभरात ४७ हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णालयाचा पहिला वर्धापनदिन वीर साव
जिजाऊ संस्था


रत्नागिरी, 5 जून (हिं.स.) । येथील भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाने अवघ्या एका वर्षात आरोग्यसेवेचे एक उत्तम उदाहरण प्रस्थापित केले आहे. या रुग्णालयात वर्षभरात ४७ हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णालयाचा पहिला वर्धापनदिन वीर सावरकर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आयसीयू (ICU) पासून ते ऑपरेशन्सपर्यंत आणि औषधांपासून ते सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांपर्यंतची आरोग्यसेवा या रुग्णालयात पूर्णपणे मोफत दिली जाते. अत्यंत अल्प कालावधीत या रुग्णालयाने रुग्णांमध्ये एक विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमादरम्यान जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांनी सांगितले की, रत्नागिरीकरांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला असून, पैशाअभावी कोणावरही उपचाराविना राहण्याची वेळ येणार नाही, हेच आमचे मोठे समाधान आहे.

या सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख आणि निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरेश प्रभू आणि हेमंत भागवत यांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्री. प्रभू म्हणाले की, कोकणी माणसांत प्रचंड क्षमता आहे, त्यांना केवळ योग्य संधी मिळण्याची गरज आहे. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जिजाऊ संस्था आणि नीलेश सांबरे यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तींची मोठी गरज आहे. निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, इतिहास हा देणाऱ्यांचा लिहिला जातो, कमावणाऱ्यांचा नाही. समाजासाठी नेहमी देणारे हात असावेत.

केवळ आरोग्यसेवाच नव्हे, तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पोलीस भरतीमध्येही ३५ स्थानिक मुला-मुलींची निवड झाली आहे, ही बाबही या कार्यक्रमात गौरवाने नमूद करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande