महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरण; शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत : मंत्री दत्तात्रय भरणे
* महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे वितरणाचा अभिनव उपक्रम मुंबई, 05 जून (हिं.स.) - राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रम
महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरण; शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत : मंत्री दत्तात्रय भरणे


* महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे वितरणाचा अभिनव उपक्रम

मुंबई, 05 जून (हिं.स.) - राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

राज्यात यंदा खरीप हंगाम प्रमाणित बियाणे व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भूईमुग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे.तसेच या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात तब्बल २ लाख प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे.

योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ३ लाख क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये ६६ हजार ७५० क्विंटल सोयाबीन तसेच ३५ हजार ५०० क्विंटल भूईमूग बियाण्यांचा समावेश असून इतर खरीप पिकांची बियाणेदेखील महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध राहणार आहेत.

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे वितरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे बियाणे वाटप प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सुलभता आणि वेग येणार आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही प्रतीक्षा न करता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा.

ते पुढे म्हणाले, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवस्थेच्या माध्यमातून कृषी सेवा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन खरीप हंगामाची तयारी वेळेत पूर्ण करावी.

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर जाऊन “बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते” या टाईलअंतर्गत अर्ज करावेत. अर्ज प्रक्रियेसाठी Agristack Farmer ID असणे आवश्यक आहे.

तसेच जास्तीत जास्त शेतकरी गटांनी पीक प्रात्यक्षिके या घटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. प्रात्यक्षिके व बियाण्यांच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande