
परभणी, 05 जून (हिं.स.)। राष्ट्रीय कर्तव्य मानल्या जाणाऱ्या जनगणना कार्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शहरातील सात शिक्षक व कर्मचाऱ्यांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जनगणना पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून नियुक्ती होऊनही वारंवार सूचना देऊनदेखील कर्तव्यावर हजर न राहिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिकेचे अधीक्षक तथा जनगणना 2027 प्रभाग समिती (क) चे चार्ज अधिकारी सय्यद आवेस हाश्मी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार फिर्याद दिली. आयुक्तांच्या आदेशानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
फिर्यादीनुसार, आगामी जनगणना कार्यासाठी सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 3 ते 5 मे 2026 या कालावधीत जिंतूर रोडवरील पोतदार इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात ते अनुपस्थित राहिले.
त्यानंतर नोटीस बजावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता शाळा बंद असल्याने प्रत्यक्ष नोटीस देता आली नाही. पुढे 18 मे रोजी स्पीड पोस्टद्वारे नोटिसा पाठवूनही संबंधित कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले नाहीत.
25 एप्रिल ते 3 जून या कालावधीतही ते अनुपस्थित राहिल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनगणना कार्यात जाणूनबुजून गैरहजेरी ठेवून कर्तव्यच्युती केल्याचा ठपका ठेवत भारतीय न्याय संहिता कलम 223 तसेच संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशासनाने जनगणना कार्य हे राष्ट्रीय महत्त्वाचे असल्याने सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने सहभाग घ्यावा, असेही स्पष्ट केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis