
नांदेड, 05 जून (हिं.स.)। मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत बिलोली तालुक्यातील तेलंगणा-मराठवाडा सीमेलगत असलेल्या माचनूर ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला असून, गागलेगाव ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवत विकासाच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच गळेगाव, बिजूर आणि कांगठी ग्रामपंचायती या विशेष पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. या यशाबद्दल संबंधित गावातील ग्रामविकास अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तालुक्यातील एकूण १५ ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग
माचनूर (प्रथम क्रमांक) : १५ लाख
गागलेगाव (द्वितीय क्रमांक) : १२ लाख
गळेगाव (तृतीय क्रमांक) : ८ लाख
बिजूर व कांगठी (विशेष पुरस्कार): प्रत्येकी ५ लाख.
प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतींचा आता जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग होणार आहे.
गावांचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, डिजिटल प्रशासन, शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक कारभार, नागरिकांचा सहभाग आणि मूलभूत सुविधांची उपलब्धता या निकषांवर झालेल्या मूल्यांकनात माचनूर व गागलेगाव
ग्रामपंचायतींनी विशेष ठसा उमटवला आहे.
मराठवाडा-तेलंगणा सीमेवरील माचनूर गावाची लोकसंख्या चार हजारांहून अधिक असून, येथे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि विकासाभिमुख दृष्टीकोनातून काम करत हे यश मिळवले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक गतिमान झाल्याचे नमूद करण्यात आले. या अभियानात गावपातळीवर शासनाच्या विविध योजना, दाखले व ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांचेही मोठे योगदान लाभले आहे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, महिला बचत गट, युवक आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक सहभागातून गावांच्या विकासाला चालना मिळाल्याचे चित्र आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis