राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मूल्यसाखळी भागीदार निवडीसाठी प्रस्ताव मागविले
आगामी १५ जूनपर्यंत शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, ५ जून (हिं.स.) : लातूर जिल्ह्यातील सोयाबीन, करडई, तीळ, भुईमूग आणि सूर्यफूल या प्रमुख तेलबिया पिकांच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया (एनएमईओ-ओए
शेतकरी


आगामी १५ जूनपर्यंत शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

लातूर, ५ जून (हिं.स.) : लातूर जिल्ह्यातील सोयाबीन, करडई, तीळ, भुईमूग आणि सूर्यफूल या प्रमुख तेलबिया पिकांच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया (एनएमईओ-ओएस) सन २०२६-२७ अंतर्गत पीकनिहाय मूल्यसाखळी भागीदार निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) आणि संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

लातूर जिल्हा तेलबिया समितीमार्फत निवड होणाऱ्या संस्थांवर शेतकरी प्रशिक्षण, प्रमाणित बियाण्यांचे वितरण, शेतकरी शेतीशाळांचे संचालन, माती परीक्षण तसेच ‘कृषी मॅपर’ पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती नोंदविण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संबंधित संस्था कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित तालुक्यात किमान तीन वर्षांचा कार्यानुभव असावा आणि संस्थेची नोंदणी मार्च २०२३ पूर्वी झालेली असणे बंधनकारक आहे. संस्थेमध्ये किमान २०० शेतकरी सभासद असणेही आवश्यक आहे.

याशिवाय, मागील तीन वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयांपेक्षा अधिक असावी. शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये किमान ३ लाख रुपयांचा शेतकरी समभाग असणे आवश्यक असून, कमी उत्पादकता असलेल्या तालुक्यांमध्ये कार्यरत तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये नोंदणीकृत संस्थांना प्राधान्य दिले जाणार आहे.

इच्छुक आणि पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात १५ जून २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande