लातूरमधील रस्त्यांवर काच घेऊन फिरणाऱ्या मनोरुग्णाला जीवदान
लातूर, 05 जून (हिं.स.)। लातूर शहरात हातात काच घेऊन फिरणाऱ्या आणि रस्त्याने जाणाऱ्या महिला व मुलींना त्रास देणाऱ्या एका मनोरुग्ण व्यक्तीला ‘रिलिजन टू रिस्पॉन्सिबिलिटी फाउंडेशन’च्या वतीने सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे स्थानिक न
मनोरुग्ण


लातूर, 05 जून (हिं.स.)।

लातूर शहरात हातात काच घेऊन फिरणाऱ्या आणि रस्त्याने जाणाऱ्या महिला व मुलींना त्रास देणाऱ्या एका मनोरुग्ण व्यक्तीला ‘रिलिजन टू रिस्पॉन्सिबिलिटी फाउंडेशन’च्या वतीने सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिला वर्गाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संबंधित मनोरुग्ण व्यक्ती हातात धारदार काच घेऊन रस्त्यांवर फिरत होता. केवळ फिरणेच नव्हे, तर रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलींना त्रास देण्याचा, त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न या व्यक्तीकडून होत होता. या गंभीर आणि धोकादायक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत त्रस्त झालेल्या नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या आणि संस्थाचालकांना फोन करून मदतीची मागणी होत होती.

नागरिकांची सुरक्षितता आणि त्या मनोरुग्णाची बिघडलेली मानसिक स्थिती लक्षात घेऊन ‘रिलिजन टू रिस्पॉन्सिबिलिटी फाउंडेशन’च्या पथकाने तातडीने पावले उचलली. आज अत्यंत कौशल्याने आणि सुरक्षितपणे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय त्याचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले असून, त्याला पुढील वैद्यकीय उपचार आणि योग्य पुनर्वसनासाठी सुरक्षितस्थळी पाठवण्यात आले आहे.

“सामाजिक सुरक्षितता आणि निराधार मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील. — रिलिजन टू रिस्पॉन्सिबिलिटी फाउंडेशन

फाउंडेशनच्या या तत्पर आणि संवेदनशील कारवाईमुळे शहरातील एका मोठ्या सुप्त धोक्याला आळा बसला आहे. संस्थेच्या या सामाजिक कार्याबद्दल लातूरकरांमधून कौतुक आणि आभार व्यक्त होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande