
अमरावती, 05 जून (हिं.स.) : अमरावती शहरातील मालमत्ता कर वसुलीवरून काँग्रेस पक्षाने केलेले वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असून ते नागरिकांची दिशाभूल करणारे असल्याचा आरोप अमरावती महानगरपालिका सभागृह नेता तथा माजी महापौर चेतन गावंडे यांनी केला आहे. त्यांनी नागरिकांना अशा राजकीय आवाहनांपासून दूर राहून वेळेवर कर भरण्याचे आवाहन केले आहे.
गावंडे यांनी स्पष्ट केले की शहराच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, उद्याने आणि आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. हा निधी प्रामुख्याने मालमत्ता करातून मिळतो. त्यामुळे कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिका प्रशासनाने थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली असून मोठे थकबाकीदार, व्यावसायिक प्रतिष्ठाने, शासकीय संस्था आणि इतर कर थकविणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि कोणालाही राजकीय संरक्षण दिले जाणार नाही,” असे त्यांनी म्हटले.
तसेच, कर वसुलीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून नागरिकांनी अफवा किंवा राजकीय वक्तव्यांवर विश्वास न ठेवता वेळेवर कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महापालिकेच्या मते, या कर वसुलीतून मिळणारा निधी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या सुधारण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी