शासकीय वसतिगृहांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; रायगडमध्ये 391 जागा रिक्त
रायगड, 05 जून (हिं.स.)।समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना HMAS MahaIT पोर्टल द्वारे अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव यांनी दिली. रायगड
शासकीय वसतिगृहांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ; रायगडमध्ये 391 जागा रिक्त


रायगड, 05 जून (हिं.स.)।समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना HMAS MahaIT पोर्टल द्वारे अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात सध्या सात शासकीय वसतिगृहे कार्यरत असून विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांसाठी एकूण 391 जागा रिक्त आहेत. महाड, पाली-सुधागड, पनवेल, अलिबाग आणि तळा येथे मुला-मुलींसाठी वसतिगृहे उपलब्ध आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास घटक तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव आहेत.

ऑनलाइन अर्जासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम पोर्टलवर नोंदणी करून युजरनेम व पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरून त्याची प्रिंट काढून संबंधित गृहपालांकडे आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन सादर करावी लागणार आहे.

प्रवेशासाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपर्यंत, तर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांसाठी 1.50 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत सन 2026-27 मधील उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, मागील इयत्तेचे गुणपत्रक, आधारशी संलग्न बँक खाते, ई-मेल आयडी तसेच मोबाईल क्रमांकाशी लिंक असलेले आधार कार्ड जोडणे बंधनकारक आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 15 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग किंवा संबंधित वसतिगृहांच्या गृहपालांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande