बीड जिल्ह्यात कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी अर्ज आमंत्रित
आगामी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन बीड, ५ जून (हिं.स.) : जिल्ह्यातील कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच काढणीनंतरच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्या
बीड जिल्ह्यात कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी अर्ज आमंत्रित


आगामी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

बीड, ५ जून (हिं.स.) : जिल्ह्यातील कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच काढणीनंतरच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ३० जून २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था (FPO), क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती आणि संस्थांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, डोंगराळ क्षेत्रे आणि आकांक्षी तालुक्यातील अर्जदारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित संस्था किमान मागील दोन वर्षांपासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम आणि कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी उभारण्याची आर्थिक क्षमता संस्थेकडे असावी. अर्जदाराचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. एका कुटुंबातील (स्वतः, पती/पत्नी आणि अविवाहित मुले) केवळ एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख रुपये प्रति युनिट (यापैकी जे कमी असेल ते) इतके अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान केवळ यंत्रसामग्री खरेदी तसेच इमारत, गोदाम किंवा साठवणूक सुविधांच्या बांधकामासाठीच लागू राहील. जमीन, वीज, मनुष्यबळ आणि इतर खर्चांसाठी कोणतेही अनुदान मिळणार नाही.

कृषी विभागाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande