
सोलापूर, ५ जून (हिं.स.) : सोलापूर ते कल्याण रेल्वे प्रवासादरम्यान एका सराफा व्यापाऱ्याची सोन्याने भरलेली बॅग चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात रेल्वे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १.१० किलो (पावणेदोन कोटी रुपये किमतीचे) सोने हस्तगत केले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील सराफा व्यापारी अभयकुमार जैन हे सोलापूरहून सिद्धेश्वर एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्यांची सोन्याने भरलेली बॅग चोरीला गेली होती. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सुमारे दहा संशयितांचा माग काढला. त्यामध्ये माढा तालुक्यातील बारलोणी, कव्हे, वडशिंगे आणि परिसरातील काही व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. के. राकेश कलासागर आणि पोलीस उपायुक्त प्रज्ञा येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर आणि पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या विशेष पथकाने गेल्या सहा महिन्यांपासून विविध ठिकाणी छापेमारी करत तपास केला.
या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींनी चोरीतील ५४८ ग्रॅम सोने कुर्डूवाडीतील एका सराफा व्यापाऱ्याला विकल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी हे दागिने जप्त केले आहेत. याशिवाय मुंबईतून ३०० ग्रॅम आणि शिलापूर परिसरातून २५० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण १ किलो १०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.
तपास सुरू असून पुढील कारवाई वेगाने राबवली जात आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड