
सोलापूर, 05 जून (हिं.स.)।
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी मतदारसंघातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटींना सुरुवात केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार सुभाष देशमुख उपस्थित नसल्याने राजेंद्र राऊत यांनी होटगी रोड येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार देशमुख यांनी राऊत यांचा सत्कार करून निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या खास शैलीत त्यांनी राऊत यांचे स्वागत केले.
दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक गटनेते अमोल शिंदे यांच्या कार्यालयालाही राजेंद्र राऊत यांनी भेट दिली. या भेटीत स्थानिक राजकीय घडामोडींसह निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती मिळाली.
विधान परिषद निवडणुकीत भाजपची स्थिती मजबूत मानली जात असली तरी विरोधकांच्या हालचालींमुळे कोणतीही गाफील भूमिका घेणे पक्षासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाजपकडून संपर्क आणि समन्वयावर विशेष भर दिला जात आहे.
विशेष म्हणजे, ही निवडणूक जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासाठीही प्रतिष्ठेची मानली जात असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड