
पुणे, ५ जून (हिं.स.) : फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरातील कथित मेथेनॉल मिश्रित गावठी दारू प्राशन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात व्यापक धडक मोहीम राबविली आहे. २९ मे ते ४ जून या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी ४७ लाख २७ हजार १४५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे आणि पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या कालावधीत विभागाने एकूण १४२ गुन्हे नोंदवून ११६ आरोपींना अटक केली आहे. कारवाईदरम्यान ८,४७२ लिटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली असून, दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे ६९,२७१ लिटर रसायन घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. याशिवाय ११,७३३ लिटर परराज्यातील व बनावट मद्य जप्त करण्यात आले असून अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ११ वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
हातभट्टी केंद्रांवर कारवाईचे आदेश
अवैध दारू विक्री व निर्मितीचे हॉटस्पॉट ठरलेल्या संवेदनशील गावांतील हातभट्टी केंद्रे पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्यांनाही गुन्ह्यात आरोपी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत.महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ९३ अंतर्गत सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी १२५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. विषारी दारू प्रकरणातील मृत्यूंचा तपास सध्या सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविलेल्या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडीच्या समन्वयाने सुरू आहे.
जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना
जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना विषारी दारूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. घंटागाड्यांद्वारे ध्वनिफिती प्रसारित करणे, अवैध दारू व्यवसायाशी संबंधित बांधकामांवर निष्कासन कारवाई करणे आणि स्थानिक प्रशासनाने सतर्कता वाढविणे यावर भर देण्यात आला आहे.तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना गावठी दारू निर्मिती व विक्रीची माहिती प्रशासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महावितरणलाही अशा अवैध व्यवसायांशी संबंधित वीजजोडण्या खंडित करण्यास सांगण्यात आले आहे.
मेथेनॉल पुरवठ्यावरही लक्ष
मेथेनॉलचा गैरवापर रोखण्यासाठी औषध प्रशासन विभागाच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील सर्व मेथेनॉल अनुज्ञप्तीधारक आणि पुरवठादारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. संबंधितांना भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १६८ अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या असून, अवैध वापरासाठी मेथेनॉलचा पुरवठा केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन
अवैध गावठी दारूपासून दूर राहावे तसेच अशा बेकायदेशीर धंद्यांबाबत माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा ०२०-२६१२७३२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.
ठळक मुद्दे
१.४७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
१४२ गुन्हे दाखल, ११६ आरोपी अटकेत
८,४७२ लिटर गावठी दारू जप्त
६९,२७१ लिटर रसायन नष्ट
११ वाहने जप्त
सीआयडीमार्फत विषारी दारू प्रकरणाचा तपास सुरू
मेथेनॉल पुरवठादारांवरही प्रशासनाची नजर
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या व्यापक मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु