एल निनोच्या भीतीने शेतकरी चिंतेत; मदतीसाठी हेल्पलाइनवरील कॉलमध्ये ६२ टक्के वाढ
पुणे, 05 जून (हिं.स.)। राज्यात ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे शेतकऱ्यांमध्ये दुष्काळाबाबतची चिंता वाढू लागली आहे. यंदा पावसाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण असून, तातडीच्या उपाययोजना आणि सर्वसमावेशक मदतीची मागणी होत
एल निनोच्या भीतीने शेतकरी चिंतेत; मदतीसाठी हेल्पलाइनवरील कॉलमध्ये ६२ टक्के वाढ


पुणे, 05 जून (हिं.स.)।

राज्यात ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे शेतकऱ्यांमध्ये दुष्काळाबाबतची चिंता वाढू लागली आहे. यंदा पावसाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण असून, तातडीच्या उपाययोजना आणि सर्वसमावेशक मदतीची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या ‘शिवार फाउंडेशन’च्या हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉलच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी महापुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आता संभाव्य दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी मदतीसाठी संपर्क साधणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

फाउंडेशनच्या माहितीनुसार, गेल्या चार महिन्यांत हेल्पलाइनवर संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६२ टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारीमध्ये ९८२ शेतकऱ्यांनी संपर्क साधला होता. ही संख्या फेब्रुवारीमध्ये १,१९५, मार्चमध्ये १,२७६ तर एप्रिलमध्ये १,५९८ वर पोहोचली. या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने दुष्काळाची शक्यता, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींबाबत चिंता व्यक्त केली.

‘शिवार फाउंडेशन’चे प्रमुख विनायक हेगाना यांनी सांगितले की, काही भागांमध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आधीच डळमळीत झाली आहे. त्यात ‘एल निनो’मुळे दुष्काळाचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याने शेतकरी आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या दबावाखाली आहेत. अशा परिस्थितीत त्यांना आधार आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

शिवार हेल्पलाइनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समुपदेशन, समस्या निराकरणासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक ती मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मदतीची आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांनी ८९५५७७१११५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande