
लातूर, 05 जून (हिं.स.)।
लातूर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ त्रासदायक राहिलेला नाही, तर तो थेट जनतेच्या जीवाशी संबंधित गंभीर संकट बनला आहे.
दररोज सरासरी ६० नागरिकांना श्वानदंश होत असून, गेल्या साडेचार महिन्यांत तब्बल ९ हजार ७८९ नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी महिन्यात २२४८, फेब्रुवारीत १९९१, मार्चमध्ये १९९७, एप्रिलमध्ये २१९९ तर मे महिन्यात २२ मेपर्यंत १३५४ नागरिकांना श्वानदंश झाल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत.
सर्वात संतापजनक बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी एका २२ वर्षीय तरुणाचा कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू झाला. एका तरुणाचा जीव जाईपर्यंत स्थानिक सत्तेत असलेल्यांना जाग आली नाही का? जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? असे तीव्र प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
आज लातूरमधील गावभाग, खडक हनुमान, पापविनाश रोड, सिग्नल कॅम्प, जुना औसा रोड, दयानंद गेट, मार्केट परिसर आणि अनेक वसाहतींमध्ये मोकाट कुत्र्यांची अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे. लहान मुलांना बाहेर खेळायला भीती वाटते, महिला आणि वयोवृद्ध नागरिक रात्री घराबाहेर पडायलाही घाबरत आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठलाग करणे, दुचाकीस्वारांच्या मागे धावणे आणि त्यामुळे अपघात घडणे, हे प्रकार आता रोजचे झाले आहेत.
हे सर्व घडत असताना स्थानिक सत्तेत असलेले लोक मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. फक्त बैठका, आश्वासने आणि कागदोपत्री मोहिमा करून हा प्रश्न सुटणार नाही. शहरात तात्काळ व्यापक निर्बीजीकरण, लसीकरण आणि मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी मोहीम राबवली गेली पाहिजे. त्याचबरोबर शहरातील कचरा व्यवस्थापन सुधारून उघड्यावर टाकला जाणारा अन्नकचरा बंद करणेही तितकेच गरजेचे आहे.
जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्क्रिय आणि बेजबाबदार स्थानिक सत्ताधाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दांत निषेध करते.
सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, लातूरकरांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर महानगरपालिकेवर जोरदार आंदोलन करण्यात आले.
ही केवळ आंदोलनाची सुरुवात आहे.... अजित पाटील कव्हेकर
जर स्थानिक सत्तेत असलेल्यांना अजूनही जाग येत नसेल, तर जनतेचा आक्रोश आणखी तीव्र होईल आणि रस्त्यावर उतरलेला लातूरकर आपल्या हक्कासाठी निर्णायक लढा उभारल्याशिवाय राहणार नाही!
यावेळी विरोधी पक्ष नेते देविदास काळे, गटनेते दीपक मठपती, सरचिटणीस संजय गिरजी, नगरसेवक गिरीश पाटीलजी, जाधव रविशंकर, गणेश गवारेजी, शोभाताई पाटील, उद्धव तेलंगे, संगीता मिरचे, भीमाशंकर बेळंबकर, ऋषिकेश राजे, स्वाती घोरपडे, मंडल अध्यक्ष सुरेश जाधाव, महिला मोर्चा अध्यक्षा शीतल मालू, दत्ता चेवलेजी, कामगार मोर्चा अध्यक्ष ज्योतीराम चिवडे पाटील, संतोष तिवारी, प्रमोद गुडे, अंकित बाहेती तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis