
अमरावती, 05 जून (हिं.स.)
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा–चांदूरबाजार मार्गावरील पेडी नदी पुलावर भीषण अपघात घडला. विटांनी भरलेला एक ट्रक पुलावरील सुरक्षा कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, विटांची वाहतूक करणारा ट्रक परतवाडा–चांदूरबाजार मार्गावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेगात असलेल्या ट्रकने पुलावरील सुरक्षा रेलिंगला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर तो थेट पुलाखाली कोसळला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, आपत्कालीन बचाव पथक, रुग्णवाहिका सेवा तसेच जेसीबी मशीनसह संबंधित विभागांचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ट्रकखाली काही जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलविले.प्राथमिक माहितीनुसार, अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.दरम्यान, ट्रकखाली आणखी कोणी अडकले होते का, याबाबतही तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाहनाचा वेग, तांत्रिक बिघाड किंवा चालकाचे नियंत्रण सुटणे यांसारख्या बाबींचा तपास केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील चौकशी सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी