सीबीआय पथकाने लातूर सोडलं, अनेकांची धाकधूक थांबली
लातूर, 05 जून (हिं.स.)। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाच्या तपासकामी लातूर शहरात तब्बल १८ दिवस मुक्काम ठोकून असलेल्या सीबीआय पथकाने काल ४ जून रोजी लातूर सोडले. पथकाने लातूर सोडल्यापासून सबंध लातूर जिल्ह्यातील काहिंची धाकधूक थांबली आहे. ३ मे २०२६ रो
सीबीआय


लातूर, 05 जून (हिं.स.)।

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाच्या तपासकामी लातूर शहरात तब्बल १८ दिवस मुक्काम ठोकून असलेल्या सीबीआय पथकाने काल ४ जून रोजी लातूर सोडले. पथकाने लातूर सोडल्यापासून सबंध लातूर जिल्ह्यातील काहिंची धाकधूक थांबली आहे.

३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट परीक्षेचा पेपर फूटला. ही परीक्षा रद्द करण्यात आली. पेपर फुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. नीट परीक्षा पेपर फुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहचले. तपासकामी सीबीआयचे पथक तब्बल १८ दिवस लातूर येथे तळ ठोकून होते. इथे त्यांनी तात्पुरते कार्यालयच केले होते. १८ दिवसात त्यांनी प्रा. पी. व्ही. कुलकर्णी व आरसीसी क्लासेसचे सर्वेसर्वा प्रा. शिवराज मोटेगावकर यांना अटक करून दिल्लीला नेले ते आतान्यायकोठडीत आहेत.

दरम्यान, सीबीआय पथकाने या १८ दिवसात शहरातील काही विद्यार्थी, पालक, पेपर फुटी प्रकरणी संशय असलेले काही श्रीमंत डॉक्टर यांची त्यांनी झडती घेतली. सीबीआय आज कोणाच्या हॉस्पीटल, घरावर रेड करणार, कोणाला नोटीस दिली, ताब्यात घेतले. अमूक डॉक्टरला अटक केली अशा चर्चा होत राहिल्या. सीबीआय पथक लातुरात आहे म्हटल्यानंतर शहरातील अनेक मी मी म्हणणाऱ्या डॉक्टरांची धाकधूक वाढली होती. काही पालक, विद्यार्थीही चौकशीच्या भितीने दडपणाखाली होते. हे पथक लातूर शहरात १८ दिवस शासकीय विश्रामगृहात मुक्कामी होतं. या पथकाचा काहिंनी एवढा धसका घेतला होता की, अनेक 'डॉक्टर' सीबीआयच्या या तात्पुरत्या कार्यालयासमोरून देखील जात नव्हते. पण १८ दिवसात सीबीआयने अनेकांची चौकशी करून 'रेकॉर्ड' केले आहे. गरजेनुसार हे पथक नंतरही एखाद्याला बोलावू शकते असे सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande