
आयआयटी बॉम्बे, सार्वजनिक बांधकाम विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
नाशिक, 05 जून (हिं.स.)।
: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी सुरू असलेली तसेच नियोजित पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारी व्हावीत, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने गुणवत्ता नियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत विविध विभागांचे अभियंते आणि अधिकारी सहभागी झाले होते. कामांच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासणी, रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शन प्रक्रिया, विविध चाचण्या, आवश्यक दस्तऐवजीकरण आणि प्रभावी गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामात गुणवत्ता ही तडजोडीचा विषय असू शकत नाही. “कोट्यवधी भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा वेळेत पूर्ण होण्याबरोबरच सुरक्षित, दर्जेदार आणि टिकाऊ असणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने आणि अंमलबजावणी यंत्रणेने गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करावे. अभियंते आणि क्षेत्रीय पथकांचे क्षमता संवर्धन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेमध्ये गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया, त्रयस्थ गुणवत्ता तपासणी, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी तपासणी पद्धती आणि तांत्रिक निकषांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, आयआयटी बॉम्बेचे प्रा. डॉ. धरमवीर सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता किशोर पाटील, नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल, कुंभमेळा प्राधिकरणाचे उपायुक्त (नियोजन) योगेंद्र चौधरी, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील आणि नाशिक महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महानगरपालिका, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, जिल्हा परिषद, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, शिर्डी नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांचे अधिकारी व अभियंते कार्यशाळेत सहभागी झाले होते.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अंतर्गत होणाऱ्या सर्व विकासकामांमध्ये नियमित देखरेख, आवश्यक चाचण्या, योग्य दस्तऐवजीकरण आणि प्रत्येक टप्प्यावर काटेकोर गुणवत्ता तपासणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV