
अमरावती, 05 जून (हिं.स.) राज्य शासनाने एप्रिल, मे व जून २०२६ या तीन महिन्यांच्या धान्यवाटपाचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात धान्य वितरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. एप्रिल महिन्याचे धान्य मे महिन्यात वितरित होण्यास सुरवात झाली, मात्र 1 मेपासून तर जूनपर्यंत अनेक ठिकाणी धान्य वितरणासाठी वापरण्यात येणारी ई-पॉस (थम्ब) मशीन बंद पडल्याने वितरणात दिरंगाई झाली. परिणामी अनेक लाभार्थी आजही धान्यापासून वंचित आहेत. सध्या जिल्ह्यात तीव्र तापमान असताना गोरगरीब नागरिकांना आपली मजुरी सोडून धान्याच्या रांगेत तासन् तास उभे राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानांबाहेर नागरिकांची मोठी गर्दी होत असून त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. धान्य दुकानदारांच्या मते, मशीनमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. तसेच तीन महिन्यांच्या धान्याचा पूर्ण पुरवठा उपलब्ध नसल्याने वितरण प्रक्रियेत अडथळे येत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांची मोठी धावपळ होत असून त्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत लाभार्थी आणि दुकानदार यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन महिन्यांपासून नियमित धान्य मिळत नसल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. शासनाने नियमित धान्य पुरवठा सुनिश्चित करावा तसेच एप्रिल, मे आणि जून महिन्याचा संपूर्ण डेटा मशीनमध्ये तातडीने समाविष्ट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यासंदर्भात प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेऊन तत्काळ निर्णय घ्यावा, जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारकडून नियमित धान्यपुरवठा होत नसल्याने आणि धान्य वितरण मशीनमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन वितरण व्यवस्था सुरळीत करावी. -अरुण भालेराव तालुकाध्यक्ष, सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना, अमरावती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी