
कोल्हापूर, ५ जून (हिं.स.) : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेने संयुक्तपणे व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मंजूर आकृतीबंधानुसार कोल्हापूर महानगरपालिकेचा स्वतंत्र ‘वाहतूक विभाग’ कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठी विशेष अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गांवरील फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी कोल्हापूर पोलीस दलाकडून महापालिकेला आवश्यक पोलीस बंदोबस्त विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे.
वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी शहरात दिवसा अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आवश्यकतेनुसार वन-वे मार्ग, नो-पार्किंग आणि नो-एन्ट्री झोनची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक साइन बोर्ड, थर्मोप्लास्टिक रस्ता चिन्हांकन (पट्टे) आणि नवीन ट्रॅफिक आयलंड उभारण्यात येणार आहेत. लोकसहभाग आणि सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून रोड डिव्हायडरची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या मोकाट जनावरांवर कठोर कारवाई करण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. याशिवाय, शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळांमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत संबंधित संस्थांशी समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहराला अधिक सुरक्षित, सुबक आणि गतिमान बनविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ, सहायक आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंते महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, शाखा अभियंता सुरेश पाटील आणि विद्युत अभियंता नारायण पुजारी उपस्थित होते.
प्रमुख निर्णय
महापालिकेचा स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करणार
महालक्ष्मी मंदिर मार्गावरील अतिक्रमणे हटविणार
दिवसा अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध
वन-वे, नो-पार्किंग व नो-एन्ट्री नियमांची कडक अंमलबजावणी
प्रमुख चौकांमध्ये नवीन वाहतूक सुविधा उभारणार
मोकाट जनावरांवर कठोर कारवाई
शाळा-महाविद्यालयांच्या वेळांबाबत समन्वय साधणार
या उपाययोजनांमुळे कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावी आणि नागरिकांसाठी सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.-------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar