
सोलापूर, 05 जून, (हिं.स.)। उजनी धरणातील पाणी गंभीर स्वरूपात प्रदूषित झाले असून ते पिण्यायोग्य राहिले नसल्याचा दावा सृष्टी इकोव्हिजन फाऊंडेशनच्या पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. यासंदर्भातील ८० पानी संशोधन अहवाल सोलापूर महानगरपालिकेकडे सादर करण्यात आला असून, उजनी धरणाचे पाणी वापरणाऱ्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २० लाख नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
अहवालानुसार, पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील मोठ्या प्रमाणावरील सांडपाणी मुळा-मुठा नदीमार्गे भीमा नदीत सोडले जाते. तसेच नीरा नदीत विविध गावांचे सांडपाणी, कत्तलखाने आणि साखर कारखान्यांमधील दूषित पाणी मिसळत असून हे सर्व पाणी पुढे उजनी धरणात येते. त्यामुळे धरणातील पाण्याची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवालात पुण्याजवळील चाकण एमआयडीसीतील काही उद्योगांमधून प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी थेट भीमा नदीत सोडले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील काही उद्योगांचे रासायनिक मिश्रित सांडपाणीही योग्य प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याने प्रदूषणात भर पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या सर्व दूषित पाण्याचा परिणाम उजनी धरणाच्या जलसाठ्यावर होत असून, त्याचा मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अहवालात कर्करोगाशी संबंधित धोकादायक घटक आणि विषाणूंच्या संभाव्य उपस्थितीबाबतही उल्लेख करण्यात आला आहे.सदर अहवाल सोलापूर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. यावेळी यशवंत पाथरुट, सागर अतनुरे, पर्यावरण संरक्षण गतीविधीचे प्रांत मंडळ सदस्य प्रवीण तळे तसेच सृष्टी इकोव्हिजन फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.दरम्यान, या अहवालातील निष्कर्षांबाबत संबंधित शासकीय यंत्रणा आणि आरोग्य विभागाकडून अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड