
पुणे, 05 जून (हिं.स.)।
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत मतभेद उफाळून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार विक्रम काकडे बिनविरोध निवडून आले. या घडामोडीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षावर विश्वासघाताचा आरोप केल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) नेते वसंत मोरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना मोरे यांनी, “दोन्ही राष्ट्रवादीच्या भाऊबंदकीचा त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे,” असे म्हणत विधानपरिषद निवडणुकीत ‘घोडेबाजार नव्हे तर १०० टक्के सेटलमेंट’ झाल्याचा गंभीर आरोप केला.
महाविकास आघाडीच्या वतीने पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे देण्यात आली होती. मात्र उमेदवारी जाहीर करण्यास झालेला विलंब आणि त्यानंतर उमेदवाराने अचानक माघार घेण्याचा निर्णय यावर मोरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ही जागा पक्षाची नव्हे तर महाविकास आघाडीची होती. मग उमेदवार कोण आणि का, हे वेळेत स्पष्ट करण्यात आले नाही. उमेदवारी माघारी घेण्याचा निर्णय घेतानाही आघाडीतील इतर पक्षांना विश्वासात घेतले गेले नाही. हा महाविकास आघाडीचा धर्म आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु