वसंतराव देशमुखांच्या उमेदवारीवर पक्षातूनच आक्षेप; शरद पवार गटात फूट पडण्याची चिन्हे
सोलापूर, 05 जून (हिं.स.)। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली असली, तरी त्यांच्या उमेदवारीवरून
वसंतराव देशमुखांच्या उमेदवारीवर पक्षातूनच आक्षेप; शरद पवार गटात फूट पडण्याची चिन्हे


सोलापूर, 05 जून (हिं.स.)।

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली असली, तरी त्यांच्या उमेदवारीवरून पक्षातच मतभेद उफाळून आले आहेत. माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी देशमुख यांच्या उमेदवारीपासून स्वतःला दूर ठेवत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.“मला विश्वासात न घेता वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या उमेदवारीशी माझा काहीही संबंध नाही,” असे स्पष्ट विधान अभिजीत पाटील यांनी केले. त्यांच्या या भूमिकेमुळे मतदानापूर्वीच शरदचंद्र पवार पक्षात अंतर्गत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत यापूर्वीही अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विजयसिंह मोहिते-पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.देशमुख यांची वैयक्तिक राजकीय ताकद मर्यादित मानली जात असली, तरी त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी आणि मोहिते-पाटील गटाची ताकद उभी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे ही निवडणूक आता भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विरोधातील लढत न राहता मोहिते-पाटील विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे असा राजकीय संघर्ष बनल्याची चर्चा सुरू आहे.अशा परिस्थितीत पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांनीच उमेदवाराविरोधात भूमिका घेतल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, याचा मतदानाच्या समीकरणांवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande