
परभणी, 05 जून, (हिं.स.)। युवा सेनेच्या वतीने राज्यस्तरीय “सडेतोड वक्तृत्व स्पर्धा 2026” चे आयोजन करण्यात आले असून युवकांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्पर्धेची जिल्हास्तरीय फेरी 7 जून रोजी सकाळी 11 वाजता पाथरी रस्त्यावरील परभणी मेडिकल कॉलेज व आर. पी. हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
या स्पर्धेत 18 ते 35 वयोगटातील विद्यार्थी, युवक-युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धा जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय अशा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. विभागीय स्पर्धांसाठी पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि नांदेड ही केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 7 जून रोजी जिल्हास्तरीय, 10 जून रोजी विभागीय आणि 14 जून रोजी राज्यस्तरीय अंतिम फेरी होणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतून तीन विजेते निवडले जाणार असून विभागीय स्तरावर प्रत्येक विभागातून दोन स्पर्धकांची निवड केली जाईल. अशा प्रकारे राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी एकूण 16 स्पर्धक पात्र ठरणार आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ‘व्हिजन महाराष्ट्र 2050’ आणि ‘राजकारण आणि समाजकारण : युवकांची भूमिका’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. विभागीय फेरीसाठी ‘माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी’ तसेच ‘एकविसाव्या शतकातील मराठी अस्मिता : आव्हाने आणि संधी’ हे विषय देण्यात आले आहेत. तर राज्यस्तरीय अंतिम फेरीमध्ये ‘महाराष्ट्र धर्म : काय जपलं पाहिजे, काय बदललं पाहिजे?’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या विचारांना व्यासपीठ मिळवावे, असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis