सोलापूरात कवठे-मुळेगाव तांड्यात हातभट्ट्या उद्ध्वस्त
सोलापूर, 05 जून (हिं.स.)। पुण्यात मिथेनॉलमिश्रित हातभट्टी दारू पिऊन मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात अवैध हातभट्टी विरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्वतः नेतृत
Hatbatti


सोलापूर, 05 जून (हिं.स.)।

पुण्यात मिथेनॉलमिश्रित हातभट्टी दारू पिऊन मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात अवैध हातभट्टी विरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. सोलापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्वतः नेतृत्व करत गुरुवारी कवठे आणि मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्ट्यांवर धडक छापे टाकले.सकाळी सहाच्या सुमारास उत्पादन शुल्क विभागाचे पथक कारवाईसाठी दाखल झाले. या कारवाईदरम्यान रबरी ट्युबमध्ये साठवून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू जागेवरच नष्ट करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कवठे येथील भोजप्पा तांडा परिसरात एका व्यवसायिकाने गावठी दारू तयार करण्यासाठी जमिनीत खोलवर बॅरल पुरून ठेवले होते. सहजपणे आढळू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शोधमोहीम राबवून हे बॅरल शोधून काढत नष्ट केले.दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या मादर्शनाखाली अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी हातभट्टी दारूचे दुष्परिणाम आणि तिच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांबाबत व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. महापालिका आणि नगरपालिकांच्या घंटागाड्यांवरील ध्वनिप्रसारक, विभागाची वाहने तसेच प्रवासी रिक्षांवर लावलेल्या पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांना जागरूक केले जात आहे.हातभट्ट्या असलेल्या गावांमधील पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या बैठका घेऊनही जनजागृती करण्यात येत आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधातील कारवाई यापुढेही दररोज सुरू राहणार असल्याचा इशारा अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिला.याचबरोबर अधीक्षक जाधव यांनी पहिल्यांदाच सोलापूर शहरात रूट मार्च काढला. रेल्वे स्टेशन रोड आणि रामलाल चौक परिसरात महापालिका व शहर पोलिसांच्या मदतीने रस्त्यालगत उभारलेले हातगाडे, अतिक्रमित टपऱ्या आणि अनधिकृत दुकाने हटविण्याची कारवाई करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande