
पुणे, 05 जून (हिं.स.)। भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमानिमित्त रविवारी (७ जून) पिंपरी-चिंचवड शहरातील काही प्रमुख मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या संदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी जारी केले आहेत.
या उपक्रमांतर्गत राजीव गांधी ब्रिज, जगताप डेअरी चौक, काळेवाडी फाटा, पुनावळे, औंध-रावेत बीआरटी रोड, मुकाई चौक आणि अंकुश चौक या मार्गांवर सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सांगवी, वाकड आणि देहूरोड वाहतूक विभागाच्या हद्दीतील काही रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक बदलांनुसार, ढोरे पाटील अंडरपासकडून डी-मार्टकडे जाणारा मार्ग बंद राहील. या मार्गावरील वाहने राजीव गांधी ब्रिजमार्गे ब्रेमेन चौकातून पुढे वळविण्यात येतील. तसेच ब्रेमेन चौकाकडून ढोरे पाटील अंडरपासकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून त्यांना प्रेमलोक चौकातून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. याशिवाय, शिवार चौकाकडून काळेवाडी चौकाकडे जगताप डेअरी मार्गे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने जगताप डेअरी अंडरपासमार्गे सावित्रीबाई फुले उद्यानाच्या दिशेने वळविण्यात येतील. तर कस्पटे चौकाकडून जगताप डेअरीकडे जाणाऱ्या वाहनांना जगताप डेअरी अंडरपासमार्गे शिवार चौकातून प्रवास करता येणार आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना नियोजित प्रवासापूर्वी पर्यायी मार्गांची माहिती घेण्याचे तसेच वाहतूक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु