
सोलापूर, 05 जून (हिं.स.)। नागपूर ते गोवा या बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील जांभूड, विठ्ठलवाडी आणि माळखांबी परिसरात ड्रोन सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेल्या फिक्स पॉईंटची उभारणी पोलिस बंदोबस्तात करण्यात आली. शेतकऱ्यांच्या विरोधाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेत ही प्रक्रिया पूर्ण केली.शक्तिपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात बागायती जमीन संपादित होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी अद्याप ठोस पुनर्वसन अथवा भरपाई धोरण जाहीर करण्यात आले नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत असून काही ठिकाणी विरोधाची भूमिका घेतली जात आहे.
ड्रोनच्या सहाय्याने अचूक मोजणी करण्यासाठी दिशादर्शक म्हणून फिक्स पॉईंटची आवश्यकता असते. त्यासाठी महसूल विभागातील विविध जिल्ह्यांतील अधिकारी आणि पोलिस पथक बुधवारी माळखांबी परिसरात दाखल झाले होते. निंबाळकर वस्ती, माळखांबी येथे सार्वजनिक रस्त्यावर फिक्स पॉईंटची उभारणी करण्यात आली.यावेळी बाधित शेतकरी संभाजी निंबाळकर, लालासाहेब गुळूमकर, नारायण निंबाळकर, सुरेश निंबाळकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. फिक्स पॉईंटबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केल्यानंतर पोलिसांनी हा पॉईंट शेतजमिनीत नसून सार्वजनिक रस्त्यावर घेतला जात असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी सुरू असलेली कार्यवाही शांततेत पाहिली.विठ्ठलवाडी, माळखांबी, पालखी महामार्ग परिसर, जांभूड येथील नायकुडे वस्ती तसेच बोडके वस्ती आदी भागांतही पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षणाची प्रक्रिया पार पडली. प्रशासनाकडून पुढील टप्प्यात ड्रोनच्या सहाय्याने सविस्तर मोजणी केली जाणार असून, शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या हालचालींवर बाधित शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड