
पुणे, 05 जून (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १ एप्रिल ते ४ जून २०२६ दुपारी २.३० वाजेपर्यंत तब्बल २८९ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कराची वसुली झाली असून, यंदाच्या आर्थिक वर्षाची सकारात्मक सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शहरातील २ लाख ७८ हजार १७ मिळकतधारकांनी मालमत्ता कर भरला आहे. महापालिकेकडून ३० जूनपूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या असून, विशेषतः ऑनलाइन कर भरणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या १० टक्क्यांपर्यंतच्या सवलतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.आतापर्यंत २ लाख ४९ हजार १४३ नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरून सवलतीचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून २६५ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक कराचा भरणा झाला असून, नागरिकांचा डिजिटल व्यवहारांकडे वाढता कल स्पष्टपणे दिसून येत आहे.पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या मालमत्ता तसेच मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या सर्व मिळकतधारकांना वेळेत कर देयके मिळावीत यासाठी महापालिकेने व्यापक नियोजन केले होते. महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता कर बिल वाटप मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने नागरिकांना वेळेत कर देयके उपलब्ध झाली.महिलांच्या नावावरील एकमेव निवासी मालमत्ता, दिव्यांग व्यक्तींच्या नावावरील मालमत्ता तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या निवासी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध करसवलती लागू करण्यात आल्या आहेत. महिलांच्या नावावरील एकमेव निवासी मालमत्तेसाठी ३० टक्क्यांपर्यंत सवलत उपलब्ध असून, पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु