
ठाणे, 05 जून, (हिं.स.)। : विधान परिषदेच्या ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विजयी उमेदवार रवींद्र फाटक यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्यामुळे, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णयांसाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे.
विधान परिषदेच्या ठाणे-पालघर मतदारसंघासाठी १८ जून २०२६ रोजी निवडणूक होणार होती. या निवडणुकीची मतमोजणी २२ जून रोजी, तर संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया २५ जून रोजी होणार होती. मात्र, ठाणे-पालघर मतदारसंघात बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी केवळ महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. त्यानंतर रवींद्र फाटक यांना निवडणुकीचे प्रमाणपत्र आज देण्यात आले. या निवडणुकीची आचारसंहिता २५ जून रोजीपर्यंत लागू होती. मात्र, आता निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे आचारसंहितेची आवश्यकता राहिलेली नाही, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे, असे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेचा कारभार ठप्प झाला आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या कामांबरोबरच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आचारसंहितेचा अडथळा येत आहे. आता निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे आचारसंहिता शिथिल केल्यास पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध निर्णय घेता येतील. तसेच महापालिकेच्या महासभा व इतर विषय समित्यांच्या सभाही घेता येऊ शकतील. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर