ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) ने काढला ऑक्सिजन मोर्चा
ठाणे, 05 जून, (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगर पालिकेवर अभिनव मोर्चा काढण
ठाणे


ठाणे, 05 जून, (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगर पालिकेवर अभिनव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात झाडे, ऑक्सिजन सिलिंडर घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून ठाणे शहरातील पर्यावरणाच्या असमतोलाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गणेशवाडी ते ठामपा मुख्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी हातात टी.'यम'.सी. असे फलक घेऊन वृक्षतोड करणाऱ्या ठाणे महानगर पालिकेचा निषेध केला. या मोर्चात यमाची वेशभूषा केलेला कार्यकर्ता सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मोर्चेकऱ्यांनी हातात एकच ध्यास, पर्यावरण विकास!; पर्यावरणाचे रक्षण, आपले कर्तव्य; झाडे आहेत जगाची फुफ्फुसे, तोडाल तर श्वास घेतील कसे; पर्यावरणाचा समतोल राखूया, भावी पिढीला जीवन वाचवूया, असे फलक हातात घेतले होते. तसेच, झाडे तोडून करणार विकास, ठामपा करते शहराला भकास ; झाडांची कत्तल करून संपतोय ऑक्सिजन, ठाणे महापालिका तयार करतेय पॉयझन; इमारती, मेट्रो- हाय वेसाठी झाडांची कत्तल,

पैशासाठी सत्ताधाऱ्यानी लढविली शक्कल; पैशासाठी कापली जाताहेत राजरोस झाडे , एक दिवस ओस पडतील सत्ताधाऱ्याही वाडे, अशा घोषणादेखील दिल्या.

दरम्यान, यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, सरकार जरी झाडे लावण्याचे आवाहन करीत असलू तरी आपण सांगतो की, आहेत ती झाडे आधी वाचवा! देशाचा सत्यानाश केला आहे. आंदमान, निकोबार, ताडोबा येथील झाडे कापली जाताहेत. उद्योगपतींना हजारो एकर जमीन देऊन तेथील झाडांची कत्तल केली जात आहे. ठाण्यात वनखात्याची 193 एकर जमिनीचा टीडीआर ठामपा देत आहे. भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. ठाणेकरांना आपण आवाहन करतो की, वेळीच जागे व्हा अन्यथा आपल्या मुलाबाळांना श्वास घेता येणार नाही, असे सांगितले. तर, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान म्हणाले, ठाणे शहरात गेल्या ६ महिन्यांत अधिकृत आणि बेकायदा पद्धतीने अंदाजे १०,००० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका आणि विविध सरकारी प्राधिकरणांनी पायाभूत सुविधांच्या नावाखाली हजारो झाडे तोडण्याचे प्रस्ताव मंजूर केले असून, अनेक ठिकाणी रात्रीच्या अंधारात बेकायदा वृक्षतोडही झाली आहे. मेट्रोसाठी ३०००, झाडे तोडली जाणार आहेत. उड्डाणपुलासाठी ३०० झाडे तोडली जाणार आहेत. शिळ - दिवा रस्त्यासाठी २८३ झाडे तोडली आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवरील पुनर्विकासासाठी एकूण १,६१४ झाडांपैकी ७२४ झाडे तोडण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी मागितली असून, यातील बरीच झाडे गेल्या काही महिन्यांत तोडली आहेत. नवीन महापालिका मुख्यालयाच्या बांधकामासाठी पोखरण रोड क्रमांक १ येथे ३२ मजली नव्या मुख्यालयाच्या बांधकामासाठी जवळपास २,६०० झाडे हटवण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी मंजूर झाला असून वृक्षतोड सुरू झाली आहे. परिणामी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळत आहे. याची पालिका प्रशासनाला जाण यावी, म्हणूनच हा मोर्चा काढला असून पालिका प्रशासनाला आम्ही ऑक्सिजन सिलिंडर आणि झाडे भेट दिली आहेत. यावरून तरी प्रशासनाला अक्कल येईल, अशी आशा व्यक्त केली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, महिला कार्याध्यक्षा फुलबानो पटेल, मिलिंद बनकर, केतन जेधे, महेश भाग्यवंत, साहिल उदुगडे, मकसूद खान, बबलू शेमना, संतोष साटम, जगत सिंग परोचा, प्रविण कडलाक, रोशन त्रिभुवन, महेश मोरे, झेद खांचे, श्रीकांत बर्वे, संदेश गमरे, सचिन भातंभरे, कल्पना नार्वेकर, मेघा गवते , ज्योती निंबरगी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande