
पुणे, 06 जून (हिं.स.)।
गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रस्तावित ५२९ झाडांच्या तोडीविरोधात पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला असून, या प्रकरणात शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप केला आहे. वृक्षतोड टाळून पर्यायी आराखड्याची अंमलबजावणी करण्याबाबत विचार करावा तसेच या विषयावर पुढील आठ दिवसांत बैठक आयोजित करावी, असे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.रिझर्व्ह बँक इन्स्टिट्यूट ते संचेती चौक या मार्गाच्या ४५ मीटर रुंदीकरणासाठी पुणे महापालिकेने सुमारे ५२९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव १ मार्च रोजी वृक्ष प्राधिकरणासमोर सादर केला होता. त्यानंतर २ एप्रिल रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. या प्रस्तावाला प्रतिसाद देत पुणेकरांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदवल्या आहेत.महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन नियमांनुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्यास संबंधित नागरिकांची प्रत्यक्ष सुनावणी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे या प्रकरणात नागरिकांच्या मतालाही महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, मेट्रो मार्ग क्रमांक ३ चे खांब उभारण्यात आल्याने काही ठिकाणी रस्त्याची रुंदी आधीच कमी झाली आहे. त्यामुळे केवळ झाडांची तोड करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही, असा दावा पर्यावरणवादी संघटनांनी केला आहे. 'परिसर'सह विविध पर्यावरण संस्थांनी उपलब्ध जागेचा प्रभावी वापर करून सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग आणि वाहतुकीचे नियोजन करण्याचा पर्यायी आराखडा सुचविला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी केल्यास एकही झाड तोडण्याची आवश्यकता भासणार नसल्याचा दावा संबंधित संस्थांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु