
मुंबई, 01 जुलै (हिं.स.) : भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) क्षेत्राच्या सर्वोच्च उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा विराजमान झाला आहे. नॉलेज रिअॅल्टी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शिरीष गोडबोले यांची इंडियन REITs असोसिएशन (IRA) च्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक अग्रवाल यांच्या निवृत्तीनंतर गोडबोले यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.
SEBI आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली २०२३ मध्ये स्थापन झालेली इंडियन REITs असोसिएशन ही भारतातील REIT क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करणारी प्रमुख उद्योग संघटना आहे. या संघटनेत देशातील सर्व प्रमुख सूचीबद्ध REITs सदस्य आहेत.
गोडबोले यांनी नियुक्तीनंतर REIT क्षेत्राला अधिक सक्षम करणे, गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढवणे, सर्वोच्च दर्जाचे सुशासन आणि पारदर्शकता कायम राखणे, तसेच उद्योगाच्या पुढील विकासाला चालना देण्याची भूमिका स्पष्ट केली.
भारतातील REIT क्षेत्राने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत देशातील सूचीबद्ध पाच REITs यांनी ४.२५ लाखांहून अधिक युनिटधारकांना एकत्रितपणे २,५६६ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे वितरण केले. संपूर्ण २०२५-२६ आर्थिक वर्षात हे वितरण ८,९०० कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.
२२ मे २०२६ पर्यंत भारतीय REIT क्षेत्राचे एकत्रित बाजार भांडवल १.७० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. ब्रुकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्ट, एम्बसी ऑफिस पार्क्स REIT, नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट, माइंडस्पेस बिझनेस पार्क्स REIT आणि नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट हे पाच सूचीबद्ध REITs देशभरातील १८७ दशलक्ष चौरस फूटांहून अधिक ग्रेड-ए कार्यालयीन आणि किरकोळ स्थावर मालमत्तेचे व्यवस्थापन करतात. स्थापनेपासून आजपर्यंत या REITs यांनी युनिटधारकांना ३१,७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे वितरण केले आहे.
गोडबोले यांना जागतिक स्थावर मालमत्ता गुंतवणूक आणि वित्त क्षेत्रातील २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी AEW कॅपिटल मॅनेजमेंट, मॉर्गन स्टॅन्ले आणि गोल्डमन सॅक्ससारख्या जागतिक वित्तीय संस्थांमध्ये वरिष्ठ नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते बाजार भांडवलाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठ्या सूचीबद्ध REIT असलेल्या नॉलेज रिअॅल्टी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी बोस्टन येथील नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी