
मुंबई, 01 जुलै (हिं.स.)। स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने भारतीय बाजारात आपला नवीन वनप्लस एन6 सादर केला आहे. हा फोन कंपनीच्या नवीन ‘एन’ सीरीजमधील पहिला स्मार्टफोन असून तो नॉर्ड लाइनअपच्या खाली ठेवण्यात आला आहे. एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये येणाऱ्या या डिव्हाइसमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6000 सीरीज चिपसेट वापरण्यात आला आहे, जो दैनंदिन वापरासोबतच मल्टिटास्किंगसाठी सक्षम कामगिरी देण्याचा दावा करतो. हा स्मार्टफोन दोन रंगांमध्ये उपलब्ध असून ४ जुलैपासून ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 8000mAh क्षमतेची मोठी बॅटरी. ही बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा फोन दीर्घकाळ बॅटरी बॅकअप देऊ शकतो आणि साधारण तीन दिवसांपर्यंत वापर टिकू शकतो. तसेच बॅटरी टिकाऊपणासाठी 1600 चार्ज सायकलनंतरही सुमारे 80 टक्के क्षमता कायम राहते असा दावा करण्यात आला आहे. यात 6.5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.
डिझाइनच्या बाबतीत या फोनमध्ये चौकोनी कॅमेरा मॉड्यूलमध्ये एक सिंगल रिअर कॅमेरा दिला आहे. समोर होल-पंच डिस्प्ले कटआउट असून त्यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा f/1.8 अपर्चर कॅमेरा देण्यात आला आहे, जो 10x डिजिटल झूम सपोर्ट करतो. हा फोन 1080p/60fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो आणि ड्युअल-व्यू व्हिडिओ मोडलाही सपोर्ट करतो.
वनप्लस एन6 मध्ये 6.75 इंचाचा एचडी एलसीडी डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 nits HBM पीक ब्राइटनेससह येतो. यासोबतच आयपी65 रेटिंग आणि मिल-एसटीडी-810एच मिलिटरी-ग्रेड ड्युरॅबिलिटी सर्टिफिकेशन देण्यात आले आहे.
हा फोन अँड्रॉइड 16 आधारित ऑक्सिजनओएस 16 वर चालतो. कंपनीने दोन मोठे ओएस अपग्रेड आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे. परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक डायमेन्सिटी 6360 एपेक्स प्रोसेसर असून अँटुटू बेंचमार्कवर 6,15,800 पेक्षा जास्त स्कोअर मिळाल्याचा दावा आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी 5300 स्क्वेअर मिमी वाष्प चेंबर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.
भारतीय बाजारात या फोनची किंमत 4GB + 128GB व्हेरिएंटसाठी 22,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिएंटसाठी 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. प्राइम डे ऑफरमध्ये 1000 रुपयांचा डिस्काउंट तसेच एसबीआय आणि अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे. सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्यायही उपलब्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule