उत्तरप्रदेश : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
उन्नाव 01जुलै (हिं.स.) : उत्तरप्रदेशातील आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवेवर उन्नावजवळ आज, बुधवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अर्टिगा कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बसमधील सुमारे १७ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतकबीर नग
यूपीच्या उन्नाव येथील अपघातग्रस्त कारचे छायाचित्र


उन्नाव 01जुलै (हिं.स.) : उत्तरप्रदेशातील आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवेवर उन्नावजवळ आज, बुधवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अर्टिगा कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बसमधील सुमारे १७ प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संतकबीर नगर येथील एक कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक मथुरा-वृंदावन येथे दर्शनासाठी अर्टिगा कारने जात होते. पहाटे सुमारे 5 वाजेच्या सुमारास उन्नाव जिल्ह्यातील देवखरी गावाजवळ आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवेवर त्यांच्या कारला समोरून आलेल्या बसने जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हरियाणाहून बिहारकडे सुमारे 85 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर प्रवेश केला आणि अर्टिगा कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस रस्त्यालगतच्या खंदकात पलटली. बसचा चालक मोहित याला वाहन चालविताना झोप लागल्याचा तसेच तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

या भीषण अपघातात कारमधील चालक विनोद कुमार (वय ४५), अंजू (वय ४०), तिची सहा वर्षीय मुलगी अमृता, १३ वर्षीय दिव्या आणि ६० वर्षीय धुनमुन यांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत व्यक्ती संतकबीर नगर परिसरातील असून त्यापैकी काहींचे मूळ गाव गोरखपूर जिल्ह्यातील पीपीगंज येथे आहे. अपघातात बसमधील सुमारे 17 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande