
नवी दिल्ली , 01 जुलै (हिं.स.)।इराणने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिवंगत सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्या खामेनेई यांच्यावर पुढील आठवड्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
यापूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खामेनेई यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले होते. वृत्तांनुसार, भारताच्या वतीने परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा आणि बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन हे पुढील आठवड्यात या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारासंदर्भातील विविध कार्यक्रम ५ ते ९ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. ५, ६ आणि ७ जुलै रोजी तेहरान आणि कोम येथे प्रमुख कार्यक्रम होणार आहेत. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, अंत्यसंस्काराला १.२ कोटी ते २ कोटी नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तेहरानमध्ये सुरक्षा, वाहतूक, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, शहरातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक मर्यादित करण्यात येणार आहे.
इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, ४ आणि ५ जुलै रोजी तेहरानमधील इमाम खुमैनी मोसल्ला प्रार्थना सभागृहात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यानंतर ६ आणि ७ जुलै रोजी राजधानी तेहरान आणि मध्य इराणमधील कोम शहरात अंत्ययात्रा काढण्यात येईल. यानंतर ९ जुलै रोजी ईशान्य इराणमधील मशहद येथे अंत्यसंस्काराचा अंतिम कार्यक्रम पार पडेल. त्याच दिवशी शिया मुस्लिमांचे आठवे इमाम इमाम रझा यांच्या पवित्र दर्गा संकुलात खामेनेई यांना गाडण्यात येणार आहे.
इराणच्या वृत्तानुसार, अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये खामेनेई यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचाही मृत्यू झाला. यामध्ये त्यांची मुलगी, एक नातू (किंवा नात), तसेच जावयाचाही समावेश असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode