जम्मू आणि काश्मीरमधील डोडामध्ये ढगफुटी, रस्ते बंद....अनेक गावांशी संपर्क तुटला
जम्मू, 01 जुलै (हिं.स.) : जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पावसासोबत झालेल्या ढगफुटीमुळे अचानक पूर आला. डोडा येथील भालीसा भागाला याचा सर्वाधिक फटका बसला. खल्जुगासर भागातील ढगफुटीमुळे पिके, फळबागा आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाले
जम्मू आणि काश्मीरमधील डोडामध्ये ढगफुटी


जम्मू, 01 जुलै (हिं.स.) : जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पावसासोबत झालेल्या ढगफुटीमुळे अचानक पूर आला. डोडा येथील भालीसा भागाला याचा सर्वाधिक फटका बसला. खल्जुगासर भागातील ढगफुटीमुळे पिके, फळबागा आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. रस्त्यांवरून चिखल आणि ढिगारा वाहत असल्याचे दिसून आले. ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत.

अनेक गावांना जोडणारे रस्ते खचल्याने आणि ढिगाऱ्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून संपर्क तुटला आहे. पण, स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. रस्ते साफ केले जात आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भालीसाच्या अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. शेतांमधील उभी पिके नष्ट झाली असून, अनेक फळबागांमधील झाडे मुळासकट उपटली गेली किंवा वाहून गेली. काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. पण, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती नाही.अचानक आलेल्या पुरामुळे आणि चिखलाच्या प्रवाहामुळे भालेशा पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ते संपर्क पूर्ववत होईपर्यंत संवेदनशील भागांतील स्थानिक रहिवाशांनी सतर्क राहावे, असा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande