
नवी दिल्ली, 01 जुलै (हिं.स.)दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास नकार दिला आहे. पण, न्यायमूर्ती सुब्रमणियम प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने चड्ढा यांनी उद्धृत केलेला पाच बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने २१ मे रोजी राघव चड्ढा यांच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला होता. सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती सुब्रमणियम प्रसाद यांनी चड्ढा यांना सांगितले की, त्यांच्या राजकीय निर्णयांवरील टीका ही वरवर पाहता त्यांच्या व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन असल्याचे दिसत नाही. उच्च न्यायालयाने म्हटले की, त्यांच्या राजकीय निर्णयांवरील टीका ही त्यांच्या व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन मानली जाऊ शकत नाही आणि ते बदनामीचा खटला दाखल करू शकतात.
राघव चड्ढा यांनी आपल्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या याचिकेत, राघव चड्ढा यांनी आरोप केला होता की, एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ अनधिकृतपणे वापरले जात आहेत. त्यांच्या कथित भाषणांसाठी त्यांचा मॉर्फ केलेला चेहरा वापरला जात होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे