
यवतमाळ, 10 जुलै (हिं.स.)
विविध आजारांनी ग्रस्त तसेच अपघातग्रस्त रुग्णांना उपचारासाठी रक्ताची अत्यंत आवश्यकता भासते. या सामाजिक गरजेची जाणीव ठेवत समाजकारण व राजकारण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे स्व. भानुदास शिंदे यांच्या जयंतीनिमित्त भानू शिंदे मित्रमंडळ व शिंदे परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्यासह तब्बल १३८ रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या संदेशाला प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केले. शिबिराची सुरवात भानुदास शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. रक्तसंकलनासाठी यवतमाळ येथील एकनिल ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने सेवा दिली. संपूर्ण शिबिरात रक्तदात्यांचा उत्साह, स्वयंसेवकांचे नियोजन आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश देणारे वातावरण निर्माण झाले. यावेळी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, उपनगराध्यक्ष सचिन बनगीनवार, तहसीलदार मयूर राऊत, ठाणेदार वैजनाथ मुंडे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजकुमार वानखडे, तालुकाप्रमुख उत्तम ठवकर, सुधीर देशमुख, सुभाष अटल यांच्यासह भानू शिंदे मित्रमंडळाचे सदस्य, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदात्यांचा सन्मान, सेवाभावाची परंपरा रक्तदान करणार्!या प्रत्येक रक्तदात्याला शिंदे परिवाराच्या वतीने प्रमाणपत्र, छत्री आणि टी-शर्ट भेट देऊन गौरविण्यात आले. रक्तदान केल्यानंतर अनेक रक्तदात्यांनी समाजासाठी उपयुक्त अशा कार्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त करत, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना प्रतिसाद देण्याची भावना व्यक्त केली.
--------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी