मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबई, 06 जुलै (हिं.स.)।सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, कर्जत-लोणावळा दरम्यानच्या भोर घाट विभागात दोन ठिकाणी दरड कोसळल्याने रेल्वेच्या तिन्ही
मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत


मुंबई, 06 जुलै (हिं.स.)।सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, कर्जत-लोणावळा दरम्यानच्या भोर घाट विभागात दोन ठिकाणी दरड कोसळल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, काही गाड्या पुनर्नियोजित करण्यात आल्या आहेत, तर काहींचे अंशतः संचालन केले जात आहे.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले की, पहिली दरड ठाकूरवाडीजवळ, तर दुसरी खंडाळा आणि मंकी हिल दरम्यान मध्य मार्गावर पहाटे सुमारे ३.०५ वाजता कोसळली. सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात माती व दगड रेल्वे रुळांवर आल्याने मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवावी लागली. रेल्वेची पथके घटनास्थळी पोहोचली असून रुळांवरील मलबा हटवून सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

कर्जत आणि लोणावळा दरम्यानचा भोर घाट विभाग हा पश्चिम घाटातील सर्वात आव्हानात्मक रेल्वेमार्ग मानला जातो. या विभागात मुंबईकडे जाणारा अप मार्ग, पुण्याकडे जाणारा डाऊन मार्ग आणि एक मध्य मार्ग आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या दरडींचा परिणाम तिन्ही मार्गांवर झाल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अनेक गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

रेल्वेने ६ जुलै रोजी धावणाऱ्या एकूण १६ गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस आणि धुळे एक्सप्रेस यांसारख्या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यायी मार्गाने चालवण्यात येत आहेत. काही गाड्यांचे संचालन मधल्या स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आले असून, काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. रुळ पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल.

रेल्वेची पथके सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. मुसळधार पावसामुळे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या गाडीचे लाईव्ह स्टेटस नक्की तपासा. केवळ रेल्वेच्या अधिकृत सूचना आणि अद्ययावत माहितीलाच विश्वास ठेवा.सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतरच मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येईल.

रेल्वेने सांगितले की, रुळांवरील मलबा हटवून सेवा शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ०२२-२२६९४०४०, ठाणे – ९३२१३३६७४७, लोणावळा – ८३५६८५४२३८, दादर – ९१३६४५२३८७

या क्रमांकांवर संपर्क साधून प्रवासी आपल्या गाडीची स्थिती आणि प्रवासासंबंधी माहिती मिळवू शकतात. रेल्वेने प्रवाशांना स्थानकावर जाण्यापूर्वी गाडीची स्थिती निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी नागरिकांना सध्या मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande