
अमरावती, 10 जुलै (हिं.स.)यंदाच्या खरीप हंगामात मॉन्सूनच्या विलंबाने लांबलेल्या पेरण्यांनी आधीच शेतकरी चिंतातूर असताना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांनी त्याच्यावर आणखी आर्थिक संकट ओढवले आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत ३४० बोगस बियाण्यांच्या तक्रारी समोर आल्या असून त्यामध्ये रोज वृद्धी होत असल्याचे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी सांगितले. खरीप हंगामातील सोयाबीन पेरणीस यंदा विलंब झाला आहे. शेतकऱ्यांनी यावेळी घरगुती बियाण्यांचा वापर कमी केला असून बाजारातून बियाणे खरेदी केले आहेत. विविध कंपन्यांची उत्पादन सरासरी अधिक असल्याच्या दाव्यांनी हुरळून गेलेल्या शेतकऱ्यांची मात्र पेरणीनंतर फसगत झाली. पेरलेले बियाणे उगवलेच नाहीत. काही ठिकाणी ते कमी प्रमाणात उगवले असून त्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीजप्रक्रिया केल्यानंतरही हा प्रकार घडल्याने शेतकरी संतापले आहेत. यासंदर्भात कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारीनंतर स्थळपाहणी करण्यात आली. खुल्या बाजारातून विक्री झालेले वाण प्रमाणीत नसल्याचे जप्ती पंचनाम्यात समोर आले आहे. जिल्ह्यातील बहूतांश सर्व चौदाही तालुक्यांतून शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या असून अमरावतीसह यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, वाशीम या जिल्ह्यातही या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांकडील शिल्लक बियाणे व दुकानदारांकडील बियाण्यांचे नमुने संकलित करण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर कठोर कारवाईची शिफारस वरिष्ठांकडे करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी सांगितले.
यासंदर्भात अमरावतीच्या जिल्हा कृषी अधीक्षक अर्चना निस्ताने म्हणाल्या की, जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल बघितल्यानंतर त्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे शिफारस करण्यात येणार आहे. जप्त करण्यात आलेले बियाणे रिसर्च व्हेरायटीच्या नावाखाली विक्री करण्यात आले असून ते प्रमाणीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी