शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा परिषद शाळेला कुलूप; 52 विद्यार्थ्यांना 2 तास शाळेबाहेर
परभणी, 10 जुलै (हिं.स.) : जिंतूर तालुक्यातील घेवडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी शिक्षण व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शाळेतील दोन्ही शिक्षक वेळेवर हजर न राहिल्याने इयत्ता पहिली ते पाचवीतील 52 विद्यार्थ्यांना तब्
शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे 52 विद्यार्थी दोन तास शाळेबाहेर; घेवडा येथील प्रकाराने खळबळ :  शिक्षण विभागाविरोधात पालक-ग्रामस्थांचा संताप; संबंधितांवर कारवाईची मागणी


परभणी, 10 जुलै (हिं.स.) : जिंतूर तालुक्यातील घेवडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवारी शिक्षण व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शाळेतील दोन्ही शिक्षक वेळेवर हजर न राहिल्याने इयत्ता पहिली ते पाचवीतील 52 विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास शाळेबाहेर थांबावे लागले. शाळेला कुलूप असल्याने विद्यार्थ्यांचा मौल्यवान शैक्षणिक वेळ वाया गेला. या घटनेमुळे पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत पोहोचले. मात्र बराच वेळ उलटूनही एकही शिक्षक शाळेत न आल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारातच थांबावे लागले. अखेर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा जाधव यांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तक्रारीनंतर सुमारे तासाभराने एक शिक्षक शाळेत दाखल झाले.

या प्रकारामुळे संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवून शिक्षण विभागाच्या कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला. ग्रामीण भागातील गोरगरीब आणि वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत नागरिकांनी शिक्षण विभागाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या संदर्भात विस्तार अधिकारी के. सी. घुगे यांनी सांगितले की, शाळेतील एका शिक्षकाची विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) कामासाठी नियुक्ती करण्यात आली असून दुसरे शिक्षक काही कारणास्तव उशिरा शाळेत पोहोचले. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गट शिक्षणाधिकारी मंजुश्री पल्लेवार यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून संबंधित शिक्षक तसेच विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती दिली.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा जाधव यांनी सांगितले की, शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शिक्षण विभागाला माहिती दिल्यानंतरच शिक्षक शाळेत आले. अशा प्रकाराकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. दोषी शिक्षकांवर तातडीने कारवाई न झाल्यास पालक व ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande