
लातूर, 10 जुलै (हिं.स.)।
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना १९४७ ला झाली. देशातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून कार्यरत असलेल्या अभाविपचा ७८ वा वर्धापन दिन तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिन उदगीर शाखेच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विद्यार्थी हिताच्या उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची सुरुवात शुभंकर मंगल कार्यालय, उदगीर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याने झाली. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून शाळा, पालक आणि शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्यात समाजाप्रती कर्तव्य भावना आणि राष्ट्रनिष्ठा अधिक दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री दिपाली चिठ्ठे, प्रमुख अतिथी म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आंबेजोगाईचे उदगीर शाखा कार्यवाह शंकर लासूने, प्रमुख वक्ते धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचर्य डॉ. दत्ता पाटील, शहर अध्यक्ष प्रा.डॉ. गौरव जेवळीकर व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर येथे राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अभाविपच्या देवगिरी प्रदेश सहमंत्री कु. दिपाली चिट्ठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, आजचा विद्यार्थी हा उद्याचा नव्हे, तर आजचाच जबाबदार नागरिक आहे. शिक्षणासोबत सामाजिक जाणीव, राष्ट्रभक्ती, चारित्र्य निर्माण आणि कर्तव्यभावना यांचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक आहे. 'मी समाजाचे देणे लागतो आणि हा समाज माझा आहे' ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थी हे केवळ पदवी मिळविणारे युवक नसून राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अभाविपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांनी उदगीर शहरातील विविध महाविद्यालयांना भेट देऊन शेकडो विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विद्यार्थी दिन आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देत शुभेच्छापत्रकांचे वितरण केले. या माध्यमातून विद्यार्थी परिषदेच्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना समाजजीवनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण दिवसभर विविध उपक्रमांमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या उपक्रमांचे स्वागत करत अभाविपच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis